Ad will apear here
Next
एक चित्तथराक क्षण

माझ्या डावीकडे एका दरीच्या तोंडावर शिळेचा एक उंचवटा होता. त्या दरीतून एक चित्ता वर आला. काही क्षण शिळेवर उभा राहिला आणि वेगाने उडी घेत आमच्या बसकडे झेपावला समोर एक सुमो होती. क्षणात त्याने तिच्या डिकीवर उडी घेतली आणि चपळाईने पलीकडील उंचवट्यावर उडी घेऊन खाली जंगलात शिरला. अप्रतिम आणि चित्तथरारक असं ते दृश्य होतं... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सहावा भाग...
...........................
आमच्या बसचा ड्रायव्हर, चाळीशीतला मध्यम उंचीचा एक गोरापान सरदारजी होता. त्याचा चेहरा आणि डोळे खूप डिस्टिंक्ट होते. डोळे निळसर घारे होते.  गडद नीळसर रंगाची पठाणी पगडी डोक्यावर घातलेला तो सरदारजी एखाद्या युरोपियनपेक्षा जास्त हँडसम दिसत होता. सरदारजीने लंगरमध्ये जेवण्याची सूचना केली. राष्ट्रीय क्रमांक एकवर, एका वळणावर बस थांबली होती. शेजारी जम्मू-काश्मीर सरकारच्या यात्रेकरूंच्या  इतर बसेसही थांबल्या होत्या. भगवान शंकराची हिंदी गाणी जल्लोषात म्हटल्याचा आवाज येत होता.

आंबलेल्या शरीराने मी खाली आलो. रस्त्याच्या एका वळणावर मोकळ्या जागेत खूप मोठा शामियाना लागला होता. खुर्च्या-टेबल ठेवले होते. यात्रेकरूंची गर्दी होती. मी आधी सगळीकडे दृष्टी फिरवली. इडली, वडा, सांभार असे न्याहारीचे दाक्षिणात्य पदार्थ होते. दुसरीकडे संपूर्ण जेवण उपलब्ध होतं. अशा प्रकारचा ऑन रोड लंगर मी प्रथमच बघत होतो. आडवे टेबल लावले होते त्यावर चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. अगदी चायनीज पदार्थांत नुडल्स,  मंचुरिअन, फ्राईड राईसही उपलब्ध होते. 

दुसऱ्या एका कोपऱ्यात चहा-कॉफीचा स्टॉल होता. हे सगळं देताना, सर्व सेवेकरी प्रेमाने आवाहन करून बोलावत होते. नम्रतेने सर्वांना ते देत होते. एक सत्तरीतले भगवे कपडे घातलेले वृद्ध ध्वनीक्षेपकावर प्रेमाने सगळयांना जेवण्यासंदर्भात, पानात खरकटे न टाकण्याच्या आणि प्रवासाच्या सूचना देत होते. प्रत्येक वाक्यावर ‘आओ भोले... आओ भोले.. खाना खाओ भोले... आपकी अमरनाथजीकी यात्रा शुभ हो..!’ अशा प्रकारे सतत सगळयांना जेवायला आवाहन करत होते. दुसऱ्या बाजूने दाल फ्राय, विविध भाज्या, फुलके, कढी, भात, राजमा चावल हे उत्तर भारतीय पदार्थ होतेच. राजमा चावल हा तर ठराविक पदार्थ उत्तरेकडे असतोच. त्याच्याशी मैत्री होणे गरजेचे होते. पुढील सात दिवस, राजमा हाजमा बिघडवणार होता किंवा पचवणार होता. आलीया राजमासी असावे जठर.. सादर..

माझ्या बिघडलेल्या हाजम्यामुळे मी पोळी राजमा खाण्याचा धोका पत्करणार नव्हतोच! कढईत गरम गरम वाफाळता रस्सम दिसत होता. शेजारी उडीदाचे वडे आणि इडली माझ्याकडे आणि मी त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत होतो. मनाचा कौल मिळाला. जठराने कौल दिला नसताच त्यामुळे त्याला विचारलंच नाही. ते सतत वेगवेगळे आवाज काढून निषेध व्यक्त करत होतं. रस्सम आणि दोन उडीद वडे, एक इडली पोटाच्या खड्डयात भरले. चहा पिण्याची इच्छा होती. तेवढ्यात काही लोकांच्या हातात सरबताचे पेले दिसले. हॉटेलमध्ये कित्येकदा मेनू कार्डवरील डिशेश बघण्यापेक्षा दुसऱ्यांच्या टेबलावरील पदार्थ बघून ते मागवण्याची लहानपणीची सवय आठवली. 

चहा घेण्यापेक्षा सरबत सरितेच्या उगमाचा शोध लावायचं ठरवलं. शेवटी योग्य जागी पोहचलोच. तेव्हा कळलं, की ते सरबत नसून ‘सोडा’ होता. सोडा मशीन मधून हव्या त्या फ्लेवरचं कोल्ड्रिंक्स मिळत होतं. गार सोडा पिऊन पिऊन हुशारी आली आणि मी आपल्या कानात इअर फोन्स घालून आपल्या जागी येऊन बसलो. सर्व लोक परत आल्यावर पाऊण तासाने आमची गाडी पुन्हा निघाली. आमचा ताफा समोर निघताच थंड हवेने लोक पेंगायला लागले. माझी आधीच झोप झाल्याने मी खिडकीतून बाहेरचं सृष्टीसौंदर्य न्याहाळत होतो. त्यामुळेच त्या अविस्मरणीय क्षणांचा मी एकटा साक्षीदार झालो. 

बाहेर जागोजागी मोठमोठ्या शिळा, दगडं पडली होती. वरून दगड माती पडू नये म्हणून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तारांच्या सहाय्याने तटबंदी केली होती. ते काम पाहताना भारतीय सैन्य आणि बीआरओचं खूप कौतुक वाटत होतं. जवळपास संपूर्ण रस्ताभर त्यांनी वर कड्याचा भाग तारांनी बांधून पक्की तटबंदी केलेली होती. 

अभिजित पानसेकाही क्षणांसाठी गाडी थांबली. मी बाहेर बघतच होतो. शेजारचा माणूस गाढ झोपला होता. तेवढ्यात एक घटना घडली. माझ्या डावीकडे एका दरीच्या तोंडावर शिळेचा एक उंचवटा होता. त्या दरीतून एक चित्ता वर आला. काही क्षण शिळेवर उभा राहिला आणि वेगाने उडी घेत आमच्या बसकडे झेपावला समोर एक सुमो होती. क्षणात त्याने तिच्या डिकीवर उडी घेतली आणि चपळाईने पलीकडील उंचवट्यावर उडी घेऊन खाली जंगलात शिरला. अप्रतिम आणि चित्तथरारक असं ते दृश्य होतं. मी जागा असल्याने मी त्या क्षणाचा साक्षीदार झालो. पुन्हा बस पुढे धावू लागली. मी स्वस्थ होतो, पण लवकरच मलाही दरीत जायचंय याची मला तेव्हा कल्पना नव्हती....

(क्रमशः) 
अभिजित पानसे- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZZIBJ
Similar Posts
उत्सुकता ‘नाशरी टनेल’ची... बस थांबली. समोर ‘वेलकम टू नाशरी टनेल’ असं लिहिलेलं. मी खूप उत्साहात होतो. कारण तीन महिन्यांपूर्वी भारतातील या सर्वांत लांब बोगद्याचं उद्घाटन झालं होतं. आणि आता त्याच टनेलमधून मी जाणार होतो.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सातवा भाग.
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती
देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा... दुपारी दोन वाजता आमच्या बसने तो बहुचर्चित खुनी आणि शैतानी नाला पार केला. थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्ध जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा एकमेव बोगदा भारत आणि काश्मीर खोरे यांना जोडतो. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. याच बोगद्यावर पाकिस्तानचंही लक्ष असतं.. स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language